ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 39 हजार हेक्टरचे नुकसान
कर्जमुक्तीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्यांना तातडीने लाभ द्यावा, त्याचबरोबर पिककर्जाचे तात्काळ वाटप करावे अशा सूचना कृषी मंत्री दादा भुसे यांनी बँकांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीला रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे आदींची उपस्थिती होती.
मराठवाड्यात सर्वात जास्त नुकसान अवकाळी पावसाने मराठवाड्यात थैमान घातला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान असल्याची माहिती कृषी विभागाने कृषी मंत्री दादा भुसे यांना आढावा बैठकीत दिली. ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील 39 हजार 325 हेक्टरवरील शेतपिकांचे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यासाठी 32 कोटी 33 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे दिली. जिल्ह्यात महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ किती शेतकर्यांनी घेतला याची माहिती घेत अधिकाधिक शेतकर्यांना तातडीने लाभ देण्याची सूचना केली. त्याचबरोबर कर्जवाटपाची स्थिती जाणून घेतली. जिल्हा अग्रणी बँकेचे श्रीकांत कारेगावकर यांनी कर्ज वाटपाची माहिती दिली. त्यावर मंत्र्यांनी शेतकर्यांना तातडीने कर्ज द्या, पीक कर्जाची योग्य नियोजन केले पाहिजे. पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकर्यांना तातडीने कर्जाचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
दरम्यान आज सकाळी कृषी मंत्री दादा भुसे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. कन्नड तालुक्यातील नागद आणि सायगव्हाण या गावातील शेत पिकांची पाहणी केली.
नाना, माझ्याशेजारी बसा !
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक सुरू असताना माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे यांचे आगमन झाले. बागडे समोर असलेल्या अधिकार्यांच्या रांगेत जाऊन बसले. तेव्हा कृषी मंत्री भुसे स्वतः उभे राहून हात जोडत म्हणाले, नाना तुम्ही माझ्या शेजारी येऊन बसा! नानांनी नकार दिला मात्र कृषिमंत्र्यांनी आग्रह केल्यानंतर ते भुसे यांच्या शेजारी आसनस्थ झाले.